जळगाव चोपडा विदगाव तापी नदी पुलावर भीषण अपघात अपघातात दोन ठार
September 30, 2025
0
जळगाव-चोपडा रस्त्यावरील तापी नदीवरील विदगाव पुलावर काल रात्री उशीरा अवैध वाळू वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, वडील व दुसरा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, ही घटना इतकी भीषण होती की डंपरच्या धडकेने कार थेट पुलावरून उडून नदीपात्रातील वाळूत जाऊन कोसळली. अपघातात विठ्ठल नगर येथील मीनाक्षी निलेश चौधरी (वय अंदाजे ३५) आणि त्यांचा मुलगा पार्थ (वय ७) यांचा मृत्यू झाला. तर निलेश प्रभाकर चौधरी आणि दुसरा मुलगा ध्रुव हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरी कुटुंब चोपडा येथे जात असताना हा अपघात घडला. निलेश चौधरी हे धानोरा येथे शिक्षक आहेत, तर मयत मीनाक्षी चौधरी या जळगावमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून, डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे नागरिकांचे प्राण जात आहेत. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर वाळू वाहतुकीला तातडीने आळा घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Tags

Post a Comment
0 Comments